प्रति,
मा. मुख्यमंत्री महोदय,
महाराष्ट्र शासन,
मंत्रालय, मुंबई.
विषय : प्रस्तावित नवीन सेवा प्रवेश नियमामध्ये वाणिज्य शाखेतील उमेदवारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन.
महोदय,
सविनय विनंती की, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 5 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या नवीन सेवा प्रवेश नियमांमध्ये Commerce Specific असलेल्या गट अ, गट ब तसेच गट क संवर्गातील Audit / Accounting / Taxation / Finance संबंधित पदांसाठी इतर शाखांच्या उमेदवारांनाही पात्र करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे वाणिज्य शाखेतील हजारो विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत आहे.
Accounting, Auditing, Taxation, Finance, Costing, Financial Management यांसारखे विषय हे पूर्णतः वाणिज्य शाखेशी संबंधित असून या विषयांचे सखोल ज्ञान वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांकडेच असते. अनेक विद्यार्थी B. Com., M. Com., CA, CMA, CS यांसारखे अभ्यासक्रम पूर्ण करून विशेषतः या क्षेत्रातील शासकीय सेवेसाठी अनेक वर्षे मेहनत घेत असतात. तसेच वाणिज्य शाखेतील जवळपास ४० ते ५० हजार विद्यार्थी दरवर्षी स्पर्धा परीक्षेला बसत असतात. अशा परिस्थितीत इतर शाखांतील उमेदवारांना या पदांसाठी पात्र ठरविणे म्हणजे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या अधिकारांवर गदा आणणारे आहे.
Commerce Specific पदे फक्त वाणिज्य शाखेसाठीच का असावीत?
विषयविशेष कौशल्य (Domain Expertise): Accounting, Auditing, Taxation, Finance, Costing, Financial Management हे विषय तांत्रिक आणि सखोल अभ्यासाचे आहेत. हे ज्ञान मुख्यतः B. Com., M. Com., CA, CMA, CS अशा अभ्यासक्रमांतूनच विकसित होते. त्यामुळे या पदांसाठी विशेष ज्ञान असलेले उमेदवारच योग्य ठरतात.
शैक्षणिक सुसंगती (Academic Relevance): Commerce Specific पदांसाठी कोणतीही पदवी (Any Degree) स्वीकारणे म्हणजे शैक्षणिक पात्रतेचा हेतूच नष्ट करणे होय. ज्या पदासाठी विशिष्ट अभ्यास आवश्यक आहे, त्या पदासाठी संबंधित शाखेचीच पात्रता असणे आवश्यक आहे.
गुणवत्ता आणि कार्यक्षमता (Efficiency in Governance): चुकीची पात्रता असलेले उमेदवार निवडले गेल्यास कामात चुका, विलंब आणि निर्णयातील त्रुटी वाढू शकतात. आर्थिक व लेखापरीक्षणाच्या चुका झाल्यास शासनाला थेट आर्थिक नुकसान होऊ शकते
वाणिज्य विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा सन्मान: विद्यार्थी अनेक वर्षे विशेष अभ्यास करून तयारी करतात जर Any Degree ला परवानगी दिली तर त्यांची मेहनत आणि विशेष पात्रता न्याय्य राहणार नाही.
स्पर्धेतील समतोल (Fair Competition): समान क्षेत्रातील उमेदवारांमध्येच स्पर्धा असावी. Any Degree मुळे अन्यायकारक स्पर्धा निर्माण होते.
प्रशासनातील गुणवत्तेचा प्रश्न: Finance, Audit, Taxation ही शासनाच्या अर्थव्यवस्थेची कणा आहेत. येथे विशेष तज्ज्ञता नसलेले उमेदवार असल्यास धोरणात्मक चुका होण्याची शक्यता वाढते.
बेरोजगारीचा प्रश्न: दरवर्षी हजारो वाणिज्य पदवीधर या क्षेत्रासाठी तयार होतात. Any Degree केल्यास Commerce विद्यार्थ्यांसाठी संधी कमी होतात.
व्यावसायिक मानकांशी सुसंगती: CA, CMA, CS सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये कठोर पात्रता निकष असतात. शासनानेही त्याच धर्तीवर विशेष पात्रतेचा आदर करणे आवश्यक आहे.
म्हणून Commerce Specific पदांसाठी “Any Degree” ही पात्रता देणे म्हणजे विशेष ज्ञानाचा अवमूल्यन असून, शासनाच्या आर्थिक व्यवस्थेच्या गुणवत्तेलाही धोका निर्माण करणारे आहे.
त्यामुळे अशा पदांसाठी वाणिज्य शाखेचीच पात्रता कायम ठेवणे अत्यावश्यक आहे.
त्यामुळे आम्ही वाणिज्य शाखेचे पदवीधर शासनाकडे विनंती करतो कि :
राज्यसेवेतून भरण्यात येणाऱ्या Commerce Specific गट' अ' आणि गट 'ब' पदांसाठी पूर्वीप्रमाणेच 'वाणिज्य शाखेतील पदवी' अशी पात्रता कायम ठेऊन राज्यसेवेत 'लेखा व लेखापरीक्षण' हा स्वतंत्र संवर्ग तयार करण्यात यावा व त्यासाठी स्वतंत्र Cut-Off लागू करण्यात यावा.
तसेच 'गट क' मधील सर्व Audit / Accounting / Taxation / Finance इत्यादी क्षेत्राशी संबंधित पदांसाठी स्वतंत्र संवर्ग तयार करण्यात येऊन त्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त वाणिज्य शाखेची पदवी अशी करण्यात यावी.
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा आणि विशेष ज्ञानाचा योग्य सन्मान राखून त्यांच्यावर होणारा अन्याय तात्काळ थांबविण्यात यावा.
आज वाणिज्य शाखेतील विद्यार्थी अत्यंत संतप्त आहेत. “फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनीच का अन्याय सहन करायचा?” हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात निर्माण झाला आहे. शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
आपला विश्वासू,