▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▆▅▄▂
https://t.me/Chalobuddhkiour ▂▄▅▆
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
◆ आपल्या कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
回☞ मराठवाडा शेड्युल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या वतीने मराठवाडा भागातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
मराठवाडा शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या वतीने मराठवाडा भागातील कार्यकर्त्यांची जुलै १९५३ मध्ये बैठक बोलावली होती. (बैठकीची तारीख आणि स्थळ उपलब्ध होऊ शकले नाही.) या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शनपर भाषण केले.
मराठवाडा भागातील कार्यकर्त्यांच्या या बैठकीत केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, कार्यकर्त्यांची अशी भावना झाली आहे की, निवडणूक म्हणजेच राजकारण. निवडणुकांशिवाय राजकारणाला दुसरा काही अर्थच नाही अशीही भावना दिसते. म्हणूनच निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळविण्यासाठी सर्वांची धडपड चाललेली असते आणि निवडणुका संपल्या की जो तो आपला स्वस्थ बसतो. परंतु समाजाचे आयुष्यात राजकारण हे एक अल्प कारण आहे. राजकारण म्हणजेच काही सर्वस्व नव्हे. खरे पाहिले तर पॉलिटिक्स, राजकारण जे काय आहे ते शेष अन्न आहे. समाजाची काही उन्नती होते, ती केवळ राजकारणाने होत नाही. समाज उन्नतीची अनेक कारणे आहेत._ _सामाजिक, आर्थिक या बाबी काही कमी महत्वाच्या नाहीत. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी या सर्व बाबींकडे सारख्याच प्रमाणात कार्यकर्त्यांनी लक्ष देणे जरुर आहे.
राजकारण हीच एक महत्त्वाची बाब आहे अशी भावना झाल्यामुळेच निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळविण्यासाठी धडपड करणे, तिकिट न मिळाल्यास समाजात फाटाफूट करणे, निवडणुकीत पडल्यास निराश होऊन स्वस्थ झोपणे आणि निवडून आल्यास असेंब्लीमध्ये जाऊन तोंड बंद करून बसणे एवढेच कार्य आहे, असा कार्यकर्त्यांचा समज होत असतो.
या हैद्राबाद विभागात आज जवळ जवळ दोन वर्षे असेंब्लीचे कामकाज चालू झालेले आहे. या विभागात राखीव जागेवर एकंदर ३१ सभासद अस्पृश्य समाजाचे वतीने निवडून आले आहेत. परंतु या दोन वर्षात त्यांनी तेथे जाऊन काय केले ? असेंब्लीमध्ये एकंदर तीन प्रकारे काम करावयाचे असते. असेंब्लीमध्ये – (१) ठराव आणणे, (२) बिल मांडणे आणि (३) बजेटचा अभ्यास करून बजेटवर भाषण करणे, या तिन्ही गोष्टींपैकी, एखादी तरी गोष्ट या ३१ लोकांपैकी एखाद्याने केलेली आहे काय ? माझ्या तरी निदर्शनास यापैकी काहीच आलेले नाही. मग कदाचित असेंब्लीच्या कामकाजाचा वर्तमानपत्रात वृत्तांत येत नसतो म्हणून मला माहीत होत नसेल. सांगण्याचा उद्देश एवढाच की, असेंब्लीमध्ये निवडून गेल्यावर निदान या गोष्टी तरी आपल्या सभासदांनी करावयास पाहिजेत. राजकारण हाच जर कार्यकर्त्यांच्या समोर मुख्य उद्देश असेल तर त्यांनी तो तरी कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पाडला आहे काय ? मला हे सुद्धा दिसत नाही.
या ३१ लोकांनी एका उद्देशाने, एका निश्चयाने, एका जमावाने जर वागायचे ठरविले तर मला खात्री आहे की काँग्रेस सरकारच नव्हे तर काँग्रेस आणि इतर पक्षही आपल्या लोकांना घाबरल्याशिवाय राहाणार नाहीत.
या ज्या राखीव जागा मिळविल्या आहेत त्या अस्पृश्य समाजाच्या हितासाठी मिळविल्या आहेत. जी माणसे आमच्यासाठी पाठविली, ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे अशा निवडून आलेल्या माणसांनी अस्पृश्य समाजाचे हितासाठी झगडावयास नको काय ? माझा जो गांधींशी विरोध होता किंवा देशातील लोकांचा आणि काँग्रेसचा जो मी विरोध सहन केलेला आहे, त्याचे कारण एकच. अस्पृश्य समाजाचे हितासाठी ते लोक काहीच करू शकत नाहीत, हेच ते कारण आहे. सरकारने किंवा या देशातील लोकांनी आमचे म्हणणे ऐकले, आमच्या मागण्या मान्य केल्या, तर मग विरोधाचे आणि लढ्याचे काहीच कारण राहाणार नाही. पण हे असे होत नाही, म्हणूनच आपणास लढावे लागते.
राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाशिवाय जगामध्ये कोणालाच काहीच साधता येणार नाही. आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा चांगला बारकाईने अभ्यास करावयास पाहिजे. ज्यांना पुढारी व्हावयाचे असेल त्यांनी पुढाऱ्याची कर्तव्यकर्मे, पुढाऱ्याची जबाबदारी काय आहे याची जाणीव ठेवावयास पाहिजे. कारण आपल्या समाजातील पुढाऱ्यांवर अत्यंत मोठी जबाबदारी आहे. इतर समाजाच्या पुढाऱ्यांसारखी आपल्या समाजातील पुढाऱ्यांची स्थिती नाही. इतर पुढाऱ्यांचे काय ? सभेत जाणे, लांबलचक भाषण करणे, टाळ्या मिळविणे आणि शेवटी हार गळ्यात घालून घरी येणे, एवढेच काम इतर पुढाऱ्यांकडे असते. आपल्या समाजातील पुढाऱ्यांना हे करून भागणार नाही. चांगला अभ्यास करणे, विचार करणे, समाजाच्या उन्नतीसाठी स्वतः रात्रंदिवस सतत अंगमेहनत करणे, हे आपल्या तरी पुढाऱ्यांना करावे लागेल. तरच तो लोकांचे थोडेफार भले करू शकेल, तोच खरा पुढारी ठरू शकेल.